इतिहासात पहिल्यांदाच मंदिर बंद; भक्‍तांनी बाहेरूनच घेतले दर्शन

Foto
आज पहिला श्रावण सोमवार
 श्रावण महिन्याला मंगळवारी (दि.21) सुरुवात झाली असून आज पहिला श्रावण सोमवार असल्याने सर्वत्र घरोघरी महादेवाचे पूजन करून ओम नमः शिवायचा गजर करण्यात आला. यावर्षी कोरोनाचे सावट पसरल्याने इतिहासात पहिल्यांदाच शहरातील महादेव मंदिर बंद असल्याने भक्तांना मंदिराच्या बाहेरून दर्शन घ्यावे लागले. आज पहिल्या श्रावण सोमवार असल्याने केवळ औपचारिकरित्या महादेवाची पूजा करून मंदिर बंद करण्यात आले असल्याची माहिती शहरातील खडकेश्वर महादेव मंदिराचे पुजारी रविंद्र नारायण चौधरी यांनी दिली.
श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी भक्तिभावाने महादेवाची पूजा करून आराधना केली जाते. यादिवशी उपवास केला जातो. दरवर्षी श्रावण महिन्यात मोठ्या संख्येने शहरातील खडकेश्वर महादेव मंदिरासह विविध महादेव मंदिरामध्ये भक्त दर्शनासाठी गर्दी करतात. महाभिषेक करून बेलपत्र वाहून ओम नमः शिवायचा गजर केला जातो. परंतु यंदा कोरोनाचे संकट ओढवल्याने यावर्षी महादेव मंदिर बंद ठेवण्यात आले. त्यामुळे खडकेश्वर महादेव मंदिराच्या बाहेरून भक्तांनी पूजा करून ओम नमः शिवायचा गजर केला. यासाठी खडकेश्वर महादेव मंदिराचे अध्यक्ष जुगलकिशोर तापडिया, अ‍ॅड. रामकीशन बाहेती, दिलीप चितलांगे, दिलीप मालू सह आदी मंदिराच्या पदाधिकार्‍यांनी सहकार्य केले असल्याचेही खडकेश्वर महादेव मंदिराचे पुजारी चौधरी यांनी सांगितले.
घरोघरी ओम नमः शिवायचा गजर
आज पहिला श्रावण सोमवारी महिलांनी घरोघरी पूजा करून ओम नमः शिवायचा जप केला. यावेळी घरात महिलांनी महादेवाची पूजा केली. यावेळी काही महिलांनी 108 बेलपत्र वाहून ओम नमः शिवाय चा जप केला. यावेळी अगरबत्ती, धूप लावून कोरोनाचे जे संकट ओढवले आहे. ते दूर कर. अशी प्रार्थना करून जनकल्याणासाठी अनेकांनी पूजा केली.